बॉलिवूडच्या या १० मोठ्या सिनेमांपेक्षा जास्त झाली वेड ची कमाई, हिंदी सिनेमांना भारी पडला ‘वेड’

बॉलिवूडच्या या १० मोठ्या सिनेमांपेक्षा जास्त झाली वेड ची कमाई, हिंदी सिनेमांना भारी पडला ‘वेड’

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाला चौथ्या आठवड्यातही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘वेड’ने आतापर्यंत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. यानिमित्ताने रितेशने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रितेशने सोशल मीडियावर ‘वेड’च्या निमित्ताने 50 कोटींची कमाई झाल्याबद्दल एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘शब्द अपुरे पडत आहेत. वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारलं आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार’, अशा शब्दांत रितेशने चाहत्यांचे आभार मानले.

अभिनेत्री सई ताम्हणकरने त्याच्या पोस्टवर ‘कडक’ कमेंट केली. लेखक क्षितिज पटवर्धन यांनीही रितेश-जेनिलियाचे कौतुक केले. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध गायक अरमान मलिक यांनीही कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ नंतर रितेशचा वेड हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट मजिलीचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे 10 चित्रपट पडले मागे

आनंद एल राय दिग्दर्शित अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ‘वेड’पेक्षा कमी होते. अक्षयच्या चित्रपटाने जवळपास 44.39 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 70 कोटी होते.

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी होते. 22 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने फक्त 19.68 कोटी रुपयांची कमाई केली.

अमिताभ बच्चन यांच्या सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘उंचाई’नेही ‘वेड’पेक्षा कमी कमाई केली. उंचाईचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 34.15 कोटी रुपये होते.

रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. डिसेंबर 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ 35.50 कोटींची कमाई केली होती.

रितेशच्या ‘वेड’ने आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’, राजकुमार रावचा ‘बधाई हो’, सनी देओलचा ‘चुप’, टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’, अर्जुन कपूरचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि जॉन अब्राहमच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’लाही मागे टाकले आहे.

Health Info Team