त्यावेळी मला माझा पाय हलवता देखील येत नव्हता…सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितला पॅरॅलीसिसचा अनुभव

मराठी मालिका सृष्टीतील माई म्हणून अशी ओळख मिळालेल्या सुकन्या कुलकर्णी मोने सध्या झी मराठीवरील अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. आभाळमाया, वादळवाट, घाडगे अँड सून, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून त्यांनी
आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. अभिनयाच्या या प्रवासात मात्र सुकन्या कुलकर्णी यांना एका अपघातामुळे बराच काळ चंदेरी दुनियेपासून बाजूला राहावे लागले होते. याबद्दल नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली आहे. यातून त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. सुकन्या कुलकर्णी या उत्कृष्ट नृत्यांगना आहेत. दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेत त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हिंदी मालिका, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.
पूर्वी चवळीच्या शेंगेप्रमाणे अगदी स्लिम असलेली अभिनेत्री सुकन्या मोने आता चांगल्याच जाड झालेल्या पाहायला मिळतात ह्यामागे देखील एक कारण आहे. एका अपघातात सुकन्या कुलकर्णी यांना पॅरॅलीसिस झाला होता. त्यांच्या शरीराचा उजवा भाग त्यांना हलवता सुद्धा येत नव्हता. त्यामुळे जे काही काम असेल ते
एकाच हाताने करायच्या. नृत्य हा आपला श्वास मानणाऱ्या सुकन्या कुलकर्णी यांना मात्र या अपघातानंतर नृत्यापासून वंचित राहावे लागले होते. जवळपास २८ वर्षे त्यांना उजवा पाय हलवणे सुद्धा कठीण होते. पण जिद्द आणि चिकाटीने त्यांनी या त्रासापासून स्वतःची सुटका करून घेतली. आपल्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी अरंगेत्रम सादर करण्याचा निश्चय केला. यात त्यांना त्यांच्या जवळच्या मैत्रिणींची सुद्धा भक्कम साथ मिळाली. शरीराचा उजवा भाग संपूर्ण पॅरॅलाईज झाल्यामुळे पाय हलवण्यासाठी त्यांनी ट्रेनरची
मदत घेतली. त्यानंतर त्या हळूहळू नृत्याचा सराव करू लागल्या. या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी अरंगेत्रम सादर करू शकले. अर्थात हे अरंगेत्रम पायाच्या दुखपतीमुळे त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने सादर केल्याने त्यांचे विशेष कौतुकही झाले होते. आता या आजारामधून सुकन्या कुलकर्णी सुखरूप बाहेर पडल्या आहेत. मात्र तरी देखील शरीराच्या उजव्या भागाला त्या कायम जपत आलेल्या आहेत. या त्रासातून त्या बाहेर पडू शकल्या नसत्या तर त्यांनी पाळणाघर चालवले असते असे त्या आवर्जून म्हणताना दिसतात.
सुकन्या कुलकर्णी यांना लहान मुलं सांभाळायची भारी हौस आहे. आपल्याला जर या सृष्टीत काम करता आलं नसतं तर ज्या मुली या क्षेत्रात काम करतात त्यांची मुलं मी सांभाळली असती आणि त्यांना प्रोत्साहन दिले असते हे ते एका मुलाखतीत म्हणताना दिसल्या. एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता अचानक जाड झालेला पाहायला मिळतो पण
त्यामागे त्यांची अनेक करणे असतात जी आपल्याला माहित नसतात असाच काहीसा प्रकार अभिनेत्री सुकन्या मोने ह्यांच्या बाबतीत घडला. अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये सुकन्या मोने पाहायला मिळायच्या पण ह्या अपघातामुळे त्यांना काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता पण मोठ्या धैर्याने त्या पुन्हा मालिका करू लागल्या आणि त्यात त्यांना यश देखील संपादन करता आलं. आता त्यांनी केलेल्या ह्या नृत्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. अभिनेत्री सुकन्या मोने ह्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…